image
  • 01
  • Mar
image

२००९ पासून महाराजांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. अगदी रिसर्च बेस्ड स्टडी नाही परंतु महाराजांबद्दल जितकं वाचता येईल...वाचायचं! वाचताना त्यातून काय शिकू शकतो ते लिहून काढायचं आणि शक्य तितक्या गोष्टी आयुष्यात वापरायच्या हे वेड लागलं असं म्हणायला हरकत नाही.
बघता बघता वह्या भरायला लागल्या आणि लक्षात आलं की महाराज हा मोठा समुद्र आहेत. जितकं खोल जाणार तेवढा अधिक खोल आणि अथांग पसरलेला ज्ञानाचा समुद्र! मला जे गवसलं ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी 'मला शिवाजी व्हायचंय!' ही व्याख्याने घ्यायला सुरुवात केली आणि याच नावाने माझं पुस्तक देखील प्रकाशित झालं. 
यात मला वैयक्तिक जास्त भावलेला प्रसंग म्हणजे 'घोडखिंडीतील लढाई' यावर अधिकाधिक अभ्यास करून त्यावर 'मराठा 300' नावाने एक सेमिनार विकसित केला. आपण खुद्द घोडखिंडीमध्ये आहोत आणि हे युद्ध स्वतः अनुभवतो आहोत (किंवा कदाचित पूर्व जन्मी मीही त्या ३०० बांदल सेनेपैकी एक असावा आणि या युद्धात माझंही रक्त सांडलं असावं असं सतत वाटतं).
आज पर्यंत ४०० हून अधिक व्याख्याने महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांमध्ये केवळ या लढाईवर घेतली. ४०० वेळा ही लढाई मी स्वतः जगत आलो आहे. प्रत्येक वेळ ही नवीच वाटते. मी स्टेजवरून घोड खिंडीत कधी जातो कळत नाही. माझं आणि श्रोत्यांचं  नातं संपून मी पूर्णतः घोडखिंडी जोडला जातो आणि जेव्हा परत येतो तेव्हा श्रोते सुद्धा तो प्रवास करून आलेले असतात. (हा श्रोत्यांकडून आलेला प्रतिसाद आहे) या लढाईशी माझं वेगळंच भावनिक नातं आहे. 
 
या प्रसंगावर चित्रपट यावा असं नेहमी वाटायचं. तो तितकाच भव्यदिव्य असायला हवा, त्यातील भावना दिग्दर्शकाने अचूक टिपयला हव्यात, आणि एकंदरीत परिणाम जबरदस्त असायला हवा असं नेहमीच वाटायचं. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी महाराजांवरील ८ चित्रपटांची मालिका घोषित केली त्यातील हा तिसरा चित्रपट आला. 
 
मला 'पावनखिंड' पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. तो १८ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आणि मी शिवजयंती आणि इतर अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे पाहू शकलो नाही. शेवटी २८ फेब्रुवारीला योग आला. मला स्वाभाविकच प्रचंड अपेक्षा या चित्रपटातून होत्या, मुळात आग्रहच होता असं म्हणा...'चित्रपट जबरदस्त असायलाच हवा.' 
 
अपेक्षा भंग झाला नाही. चित्रपट अप्रतिम बनला आहे. अगदी पहिल्या दोन चित्रपटांचा तुलनेने हा चित्रपट वेगळ्या उंचीवर गेला आहे. 
 
चित्रपटाचा पहिला अर्धा भाग थोडा संथ वाटतो परंतु घोडखिंडीच्या लढाईची पार्श्वभूमी निर्माण करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा होता. 
 
जशी कथा पुढे जाते तसा तो अधिक इंटेंस व्हायला लागतो. प्रेक्षक पूर्णतः त्यात गुंतून जातात. आपण भावनिक दृष्टीने चित्रपटाशी एकरूप होतो. यासाठी लेखक-दिग्दर्शकाचे करावे तेवढे कौतुक कमीच!
 
मला सगळ्यात जास्त भावला तो शिवा काशीद यांचा भाग. आपण महाराजांसारखे दिसतो याचं अप्रूप आहे आणि त्याचवेळी आपण महाराज नाही याची जाणीव देखील आहे. आपण ज्या योजनेचा भाग होतोय त्या योजनेचा अंत मृत्यू आहे हे माहीत असताना देखील पालखीत महाराज म्हणून बसायला तयार असणं. महाराज आणि शिवा काशीद यांच्या पालख्या जिथे वेगळ्या होणार आहेत तिथे त्याचा हात धरून ' तू आमच्या सोबतच चल' म्हणणाऱ्या महाराजांची भावनिक घालमेल आणि ' महाराज लहान तोंडी मोठा घास...पण मला हे करु द्या' असं ठामपणे सांगणारा शिवा काशिद. पालख्या वेगळ्या होताना एकीकडे डोळे पाणावलेले महाराज आणि दुसरीकडे चेहऱ्यावर स्मित हास्य आणि डोळ्यात चमक असलेला शिवा काशीद! हा प्रसंग इतका सुंदर मांडलाय की शब्द नाहीत. 
 
प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्यात बाजी प्रभूंची भूमिका करणाऱ्या अजय पुरकर यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे. भूमिकेसाठी त्यांची निवड किती उत्तम होती हे त्यांनी त्यांच्या सर्वांगसुंदर अभिनयाने सिद्ध केलंय. महाराजांची भूमिका या वेळी चिन्मय मांडलेकर यांनी अतिशय उत्तम साकारली आहे. (या आधी फर्जंद मध्ये मला इतकी भावली नव्हती). इथे महाराजांची भूमिका ते खऱ्या अर्थाने जगले.
 
चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत अप्रतिम जमलंय. 'माझ्या राजा रं!' कित्येक तास कानात घुमत राहतं. युद्ध चालू असताना, बाजीप्रभू जखमी आहेत, त्यांना गोळी लागली आहे तरी ते लढताहेत आणि बॅकग्राऊंड ला ' बाळा आई तुला हाक देतेय...तू थकला असशील, माझ्या कुशीत ये...' या आशयाचं भावनिक गाणं आणि  बाजी थांबत नाहीयेत कारण तोफांचे आवाज आलेले नाहीत... या प्रसंगी डोळ्याच्या कडा पाणावल्या शिवाय रहात नाहीत. 
 
बजेट मोठा असता तर चित्रपट अजूनही दमदार होऊ शकला असता. परंतु एवढ्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या कुटुंबासहित पावनखिंड पाहायला हवा. आपल्या लहान मुलांना आवर्जून दाखवायला हवा. 
महाराज वाचावेत म्हणून त्यांची काळजी वाहणारे मावळे, महाराज वाचावेत म्हणून देह भान हरपून लढणारे मावळे, महाराज वाचावेत म्हणून हसत मृत्यूला कवटाळनारे मावळे, जो पर्यंत तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत मृत्यूला थोपवून कित्येक तास लढणारे मावळे, तोफांचा आवाज आल्यावर समाधानाने प्राण त्यागणारे मावळे.... धन्य ते मावळे...धन्य ते महाराज...आणि हे पाहून धन्य झालेले आपण प्रेक्षक!