image
  • 30
  • Aug
image

१.    अलिप्त व्हा:

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि || ४७ ||

र्थात, कर्म करा. फळाची चिंता करू नका.

  • फळ (गोल) ठरवा.
  • तो प्राप्त करण्यासाठी आवश्यक कृती योजना (Action Plan) आखा. 
  • ठरलेल्या कृती पार पाडत चला आणि हे करताना आता फळाची चिंता सोडून द्या. संपूर्ण लक्ष आवश्यक कृतींवर केंद्रित करा आणि त्या पार पाडण्यासाठी जीवाचं रान करा. या प्रक्रियेचा आनंद घ्या. कारण फळप्राप्तीचा आनंद हा काही क्षणांचा असतो. तो प्राप्त करण्याचा प्रवास आपल्याला अनुभव देतो, कौशल्ये विकसित करतो आणि एक व्यक्तिमत्त्व म्हणून वाढण्यास मदत करतो. 

 

२.    नशीब कधी साथ देतं?

अधिष्ठानं तथा कर्ता करणं  पृथग्विधम्
विविधाश्र्च पृथक्वेष्टा दैवं  एव अत्र पंचमम् ||

     आपल्याला आयुष्यात जे हवं ते प्राप्त करण्यासाठी ५ गोष्टींची आवश्यकता असते.

  • अधिष्ठान (current position): तुमची सद्य स्थिती ओळखा. तुमच्याकडे ध्येयप्राप्तीसाठी सध्या कोणती साधने, कौशल्ये, ज्ञान, पाठींबा उपलब्ध आहे  आणि काय कमी पडतंय याचा शोध घ्या.
  • कर्ता (Doer- action oriented): जे ठरवलंय ते कोणत्याही परिस्थितीत पार पाडा.
  • करण (resources): ध्येयापर्यंत पोहच्यासाठी आवश्यक साधन सामग्री गोळा करा.
  • प्रयत्न (efforts): जो पर्यंत यश मिळत नाही, प्रयत्न सोडू नका.
  • दैव (luck): वरील ४ गोष्टी केल्यानंतरच गोष्टी दैवावर किंवा नशिबावर सोडून द्या.  

"प्रयत्नांती परमेश्वर" " हिंमते मर्दा तो मददे खुदा" यालाच तर म्हणतात. श्रीकृष्णाने भगवद् गीतेत दैवाला पाच कारणांपैकी पाचवे स्थान दिले आहे. अध्यात्मातही पुरूषार्थाला प्रथम आणि दैवाला दुय्यम स्थान दिले आहे. त्यामुळे नशिबावर सोडण्याआधी आपण आधीच्या ४ गोष्टींवर काम केलंय का? हा प्रश्न स्वतःला जरूर विचारा. 

 

३.    चालू क्षणात जगा:

जर आपल्याला भविष्यात काय घडणार हे माहित असतं तर काय झालं असतं?

जर ते चांगलं घडणार असतं तर आपण तो क्षण येण्यासाठी अधीर झालो असतो आणि वाईट घडणार असतं तर चिंतातूर झालो असतो. म्हणजे दोन्ही बाजूंनी आपण एका गोष्टीला मुकलो असतो ते म्हणजे वर्तमानात (चालू क्षणात) जगणं. मुळात आपल्याला उद्या काय घडणार हे माहित नसताना देखील आपण उद्यामाध्येच गुंतलेलो असतो. श्री कृष्णाला पुढे काय घडणार हे माहित असून देखील तो वर्तमानात जगायचा, चालू क्षणात जागरूक राहायचा. आपण वर्तमानातच जागूनच जे करतोय त्यामध्ये उत्कृष्ट देवू शकतो आणि आयुष्याचा दर्जा वाढवू शकतो. आपले मानसिक आरोग्य राखण्यासाठी सुद्धा ‘जागरूकता’ महत्त्वाची. म्हणूनच कृष्ण आपल्याला भूतकाळात किंवा भविष्यात नाही तर ‘चालू क्षणात’ जगायला शिकवतो.

 

४.    भोवताली सकारात्मकता निर्माण करा:

“अंधाराला दोष देत बसण्यापेक्षा एखादा दिवा पेटवणं केव्हाही उत्तमच!”

भोवताली अनेक मायावी राक्षसांची (सैतानी प्रवृत्ती) होणारी आक्रमणे, उद्भवणारी भयंकर संकटे इ. मुळे भोवताली नकारात्मकतेचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक होतं.

या नकारात्मकतेत देखील चेहरा हसरा ठेवणं, संकटाना मोठं होऊ देवू न देता आपण त्यांच्यापेक्षा मोठे होणं (कौशल्ये विकसित करून, सामर्थ्य वाढवून) आणि त्यांना सामोरे जाऊन त्यांचे समूळ उच्चाटन करणं हे आपण श्री कृष्णाकडून शिकतो.

बसुरीच्या सुमधुर स्वरांतून आपल्या आतील आनंद इतरांना वाटणे. आवश्यकता पडेल तिथे मदतीसाठी उभे राहणे, जे घडेल ते चांगल्यासाठीच ही शास्वती इतरांना देवून सकारात्मकता कशी निर्माण करावी हे आपण श्री कृष्णाकडून शिकातो.

 

५.    नम्रपणा:

कौरवांची सर्व सेना नष्ट करण्या इतकी ताकद एकट्या श्री कृष्णामध्ये होती. तरीही त्याने अर्जुनाचा सारथी होण्यात धन्यता मानली. ज्याचे कर्म हे त्यानेच केले पाहिजे हा संदेश देवून विजयाचे श्रेय स्वतः न घेता पांडवांना दिले. समोर असलेल्यी व्यक्ती बालक असो की वयोवृद्ध, स्त्री असो की पुरुष, प्रत्येकाशी आदराने वागला. सुदामा अतिशय गरीब मित्र असून सुद्धा त्याचे आदरतिथ्य आणि सेवा केली,  हा नम्रपणा आपण श्री कृष्णाकडून शिकायला हवा.

 

६.    आपल्या आयुष्याचं ध्येय काय असावं?:

परित्राणाय साधूनां, विनाशाय  दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।

आपल्या आयुष्यात प्रामुख्याने ३ ध्येये असावीत:

  • परित्राणाय साधूनां – चांगल्याचं रक्षण करणे.
  • विनाशाय च दुष्कृताम् – वाईटाचा (वाईट प्रवृत्तींचा) नाश करणे.
  • धर्मसंस्थापनार्थाय – धर्माची (योग्य मार्गाने आयुष्य सफल करणाऱ्या उत्तम तात्विक विचारसरणीची) स्थापना करणे.

श्री कृष्णाप्रमाणे आपणही आपल्या जीवनात या ३ ध्येयांचा सातत्याने मागोवा घ्यायला हवा.

 

७.    ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती कामाच्या व्यापात हरवू देवू नका:

आपला एखादा छंद ज्यातून आपल्यला आनंद मिळतो तो कधीच सोडू नका. सतत येणाऱ्या आपत्तीमध्ये सुद्धा श्री कृष्णाने आपली बासुरी वाजवणे सोडले नाही. आपल्या बसुरीच्या सुरांनी तो सतत इतरांना आनंद देत राहिला आणि स्वतःदेखील आनंद मिळवत राहिला. इतकंच नाही तर महाभारताच्या युद्धात देखील त्याच्या कंबरेला बासुरी बांधलेली दिसते. असा आपला एखादा छंद आपल्याला आपल्या मुख्य ध्येयाकडे पोहचण्यासाठी आवश्यक उर्जा पुरवीत असतो. त्यामुळे याचा त्याग करून चालणार नाही.

 

८.    कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हात नाही पण...

"दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ||"
"मानसाचा जन्म कुठे होतो ते दैवाच्या हातात आहेपण पराक्रम माझ्या हातात आहे."

श्री कृष्णाचा जन्म कंसाच्या कोठडीमध्ये झाला. अशा ठिकाणी जन्म होणं ही खरतर दुःखाची बाब म्हणता आली असती. परंतु श्री कृष्णाने आपल्या कर्तुत्वाने अनेक दानवांना पराभूत केले, द्वारका नागरी उभारली, कंसाचा वध करून जनतेला त्याच्या जाचातून मुक्त केले आणि महाभारतामध्ये पांडवांचा मार्गदर्शक होऊन अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. भगवदगीतेतून पिढ्यानपिढ्या लागू होतील अशी मार्गदर्शक तत्त्वे दिली. अशा पद्धतीने अंधाऱ्या कोठडीत जन्म घेतलेल्या कृष्णाने जगाला प्रकाशाने भरून टाकले.

त्यामुळे आपला जन्म कुठे झालाय याचा विचार करत बसण्यापेक्षा मिळालेल्या आयुष्यात कर्तुत्व गाजवून इतरांसाठी प्रेरणा कसे बनू शकतो याचा विचार करा.