महाराष्ट्र बिझिनेस क्लब (एम बी सी) आऊटबाऊंड च्या निमित्ताने पुन्हा एकदा सह्याद्री फार्म्स ला जाण्याची संधी मिळाली. खरं तर ही सह्याद्री फार्म ला जाण्याची माझी किमान पाचवी वेळ असावी. (२०१५-१६ मध्ये) सह्याद्री फॉर्मच्या व्हिजन, मिशन आणि व्हॅल्यूज सेट करणाच्या प्रक्रियेमध्ये आमच्या आय ट्रेनिंग टीमचा समावेश होता, हे खरंतर आम्ही आमचे भाग्य समजतो. कारण या दोन दिवसांचा प्रवास आमच्या टीमसाठी सुद्धा महत्त्वाचा अनुभव होता. त्या दोन दिवसांमध्ये एका चांगल्या संस्थेशी नातं जुळलं ते कायमचंच!
आता थोडं सह्याद्री फार्म्स (सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) विषयी बोलूया. सह्याद्री फार्म्स हे मोहाडी च्या एका डोंगरावर उभं असलेलं एक भन्नाट साम्राज्य. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली आणि शेतकऱ्यांमार्फत चालवली जाणारी कंपनी म्हणजे सह्याद्री फार्मर्स! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आराखडा नजरेसमोर ठेवून उभी ठाकलेली, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटायला भाग पाडणारी सह्याद्री फार्म्स!
सह्याद्री फार्म ची स्थापना नाशिक मधील एका तरुणाने म्हणजेच श्री. विलास शिंदे यांनी २०१० साली केली. आजच्या सह्याद्री फार्मचे ते चेअरमन आणि सर्वेसर्वा आहेत. एम. बी. सी. च्या उद्योजकांना त्यांच्याशी चर्चा करता यावी यासाठी एक सत्र सह्याद्री फार्म च्या एका सेमिनार हॉलमध्ये राबवण्यात आले. विलास शिंदे सरांशी झालेल्या या चर्चेतुन काही मोती मी वेचले आहेत जे नवोदित उद्योजकांसाठी किंवा उद्योग क्षेत्रात स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतील, ते या लेखा मार्फत तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. मला खात्री आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पण त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवर्जून वाचावा अशी विनंती.
१. सतत येणाऱ्या अपयाशांतून कम बॅक कसा करावा?
शेतीमध्ये पदव्युत्तर उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एखाद्या उच्च नोकरीची वाट न पकडता स्वतःचं काहीतरी उभं करणं, आपण ज्या मातीत जन्म घेतला आहे त्या मातीतल्या लोकांना समृद्ध काढण्यासाठी त्यांचं असं काही निर्माण करणं हे स्वप्न घेऊन खरतर १९९५ पासून एका प्रवासाला सुरुवात झाली. १९९५ ते २०१० या वर्षांमध्ये विलास शिंदे यांनी अनेक अपयशं पाहिली. आपण कित्येक साम्राज्याची सुरुवात शून्यातून होताना पाहिली आहे परंतु सह्याद्री फार्म्सची सुरुवात साडे सहा कोटींच्या कर्जातून झाली आहे.
सुरुवातीला मका आणि टरबुजाच्या शेतीचा प्रयोग केला, तो काही कारणांनी फसला. त्यामागोमाग स्वतःचं डेरी फार्म सुरू केलं पण त्यामध्येही यश आलं नाही. इथवर डोक्यावर ७५ लाखापर्यंत कर्ज झालं. तरीही न डगमगता निर्यातीचा व्यापार सुरू केला. द्राक्षांच्या निर्यातीवर विशेष भर देण्यात आला. यात थोडा जम बसतोय असे वाटत असताना, युरोपात पाठवलेल्या काही कंटेनरचे पैसे तेथील व्यापाऱ्यांनी बुडवल्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि पुढे युरोपात भारतीय द्राक्षांवर आयातीच्या आलेल्या निर्बंधांमुळे नुकसान होऊन कर्ज साडेसहा कोटी पर्यंत जाऊन पोहोचले. आता या परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांनी उद्योग करण्याचा विचार सोडून दिला असता आणि काही जणांच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा आले असते. पण इथे न डगमगता विलास सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ६२३ शेतकऱ्यांना घेऊन सह्याद्री फार्मची स्थापना केली आणि या सह्याद्रीने येत्या दहा वर्षात या क्षेत्रामध्ये आपला जबरदस्त ठसा उमटवला आहे. आज प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे ६,००० कामगार सह्याद्रीसाठी काम करत आहेत. ४२ देशांमध्ये सह्याद्री निर्यात करते आहे आणि तिची २०२०-२१ची वार्षिक उलाढाल सुमारे ५२५ कोटी वर पोहचली आहे.
हे कसं जमलं? एखाद्या अपयशाने खचून जाणारे, आपले उद्योग बंद करणारे अनेक उद्योजक मी पाहिले आहेत. परंतु अशी कोणती गोष्ट होती जीने विलास शिंदे यांना जिद्दीने पुढे चालत राहायला प्रोत्साहित केले असेल? त्यांच्या उत्तरातून मला सापडलेल्या या दोन गोष्टी;
एक म्हणजे आपला 'थॉट प्रोसेस' स्पष्ट असायला हवा. आपण जे काही करतो आहोत त्यामागील हेतू कायम स्पष्ट हवा. 'शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काही करायचं' हा हेतू स्पष्ट असल्यामुळे विलास शिंदे येणाऱ्या अपयाशांतून न डगमगता पुढे चालत राहिले.
दुसरी गोष्ट म्हणजे अपयश दोन गोष्टींमुळे येऊ शकते. एक म्हणजे स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींमध्ये झालेल्या चुकांतून येणारे अपयश आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींमधून आलेले अपयश.
दुर्दैवाने ते सुरुवातीला ज्या गोष्टी करत गेले त्यात नियंत्रणाबाहेर अनेक गोष्टी घडून त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. उदा. भारतीय द्राक्षांत काही औषधांचे अंश प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याने त्यांच्या आयातीवर युरोपीय महासंघाने निर्बंध लादले आणि याची कल्पना संबंधित यंत्रणांनी योग्य वेळी दिली नाही. ही चूक आपल्या ताबा क्षेत्राबाहेरील होती. त्यामुळे अशा वेळी खचून न जाता 'मी माझ्याबाजूने पूर्ण प्रयत्न केले, बाह्य परिस्थितीची साथ लाभली नाही आणि आलेल्या अनुभवांतून पुढे यश मिळवण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढली आहे' या आत्मविश्वासाने पुढे चालायला हवं.
आणि आपल्या नियंत्रणात असू शकलेल्या गोष्टींच्या बाबतीत चूका झाल्या असतील तर त्यावर मंथन करून, त्या दुरुस्त करून, पुढच्या वेळेस अधिक तयारीने उतरायचे आणि आपल्या स्वप्नांचा मागोवा घ्यायचा, माघार घ्यायची नाही.
आपण आपलं अपयश हे पैशांच्या स्वरुपात ठरवत असतो. जे साफ चुकीचे आहे. या प्रवासात कधी नफा होईल तर कधी तोटा. परंतु आपले स्वप्न मोठे आणि स्पष्ट असेल तर हे अडथळे छोटे वाटायला लागतात.
२. इव्हॉल्व्हिंग व्हिजन (हळू हळू अस्थितवात येत जाणारे स्वप्न)
आज सह्याद्री मोहाडीच्या टेकडीवर ९५ एकरांत पसरली आहे. जागतिक स्टॅंडर्डच्या फॅक्टरीज्, अद्ययावत यंत्रसामग्री याच्या आधारावर शेती व्यवसायाला वेगळं ग्लॅमर सह्याद्रीने मिळवून दिले आहे.
आज जी सहयाद्री उभी आहे त्याचे चित्र २०१०लाच आपल्या नजरेसमोर होते का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की त्याचा एक आराखडा आमच्या नजरेसमोर होता आणि त्याचे टप्पे ठरलेले होते. ठरलेल्या टप्प्यांनुसार एकेक गोष्ट आम्ही घडवत गेलो. आणि आमच्याशी जोडलेल्या लोकांना हे स्वप्न स्पष्ट होत गेलं. यालाच इव्हॉल्व्हिंग व्हिजन असे म्हणतात. आपणही आपल्या व्यवसायात येत्या १०-१५ वर्षात काय असू याचा एक आराखडा आपल्या नजरेसमोर हवा. त्यांना टप्प्यांमध्ये विभागले जायला हवे आणि एकेक टप्पा प्राप्त करत ते स्वप्न अस्थिवात आणायला हवे.
३. मी हात देऊ शकतो, कुणाला खांद्यावर घेऊ शकत नाही.
या महाराष्ट्रात इतरही अनेक खेडी आहेत जिथे छोट्या जमिनी असलेले शेतकरी आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ते सह्याद्रीशी कसे जोडले जाऊ शकतात? असे विचारले असता ते म्हणाले. सध्या सह्याद्रीचा व्याप फार मोठा आहे. इथल्या शेतकाऱ्यांसाठीच आम्ही अपुरे पडतो आहोत. या महाराष्ट्राला अशा एक नाही तर अनेक सह्याद्रींची गरज आहे. माझ्या खांद्यावर आधीच खूप भार आहे. त्यात आणखी कुणाला खांद्यावर घेऊन मी तो भार वाढवू इच्छित नाही. परंतु हात देऊन नक्कीच मदत करू शकतो. सह्याद्रीने आपल्या अनुभवाच्या आधारे अनेक फार्मर प्रोड्यूसर कंपनी तयार व्हाव्यात यासाठी, त्यांना प्रशिक्षण द्यावे या हेतूने टाटा स्ट्राईव्हशी हात मिळवून सह्याद्रीमध्ये प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. त्यामधून सह्याद्री सारख्या अनेक कंपनी घडतील आणि आपापल्या विभागांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी काम करू शकतील. त्यांना समृद्ध करू शकतील. अशा पद्धतीने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या एकजूट झाल्यामुळे आणि सुयोग्य यंत्रणेचा वापर केल्यामुळे दूर होऊ शकतील.
"कुणाला खांद्यावर घेऊन स्वतःचा भार वाढवू नका. त्यांना उभे राहण्यास मदत करण्यासाठी हात द्या." वा! किती मोठा धडा होता हा!
४. पारदर्शकता:
सह्याद्रीची कोणतीही फळे किंवा भाज्या आपण विकत घेतल्यात तर त्यावर बारकोड असलेले आढळतील. त्या बारकोडला स्कॅन केलंत तर ती भाजी किंवा फळ कोणत्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पिकले आहे, त्यासाठी कोणती खते किंवा कीटकनाशके वापरली आहेत इ. माहिती मिळू शकते. तसेच शेतकऱ्याने केलेले उत्पादन ग्राहकाला किती किंमतीमध्ये विकले गेले आहे हे देखील शेतकऱ्याला कळू शकते इतकी कमालीची पारदर्शकता सह्याद्रीमध्ये पाळली जाते. पारदर्शक व्यवहारातून विश्वास निर्माण होतो आणि जास्तीत जास्त चांगली माणसे जोडली जाऊ शकतात आणि अर्थातच ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांचे या वातावरणात जमत नाही. पारदर्शकता ठेवून, अधिकृत कामे करून, मूल्ये पाळूनदेखील या दुनियेत व्यापार केला जाऊ शकतो हे सह्याद्रीकडून शिकायला मिळतं.
जो आनंद आणि प्रेरणा रायगडावर गेल्यावर मिळते त्याच्याच काही अंशी प्रेरणा सह्याद्रीमध्ये गेल्यावर अनुभवता येते.
कोणत्याही सरकारी योजनांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना स्वाभिमानाने, ताठ मानेने उभं रहायला शिकवणारी, शेतकऱ्यांच्या मेहनतीचं चीज करून देणारी, अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली, ७९८८ नोंदणी केलेले शेतकरी भागदारक असलेली, २३,९९० एकर जमिनीवर लागवड करणारी, १२० गावांमध्ये कार्यरत असणारी, जगभरात ३३,०३६ हुन अधिक ग्राहकांना सेवा पुरवणारी, १६०० टन द्राक्षे तसेच ५५५१३ मॅट्रिक टन टोमॅटो दर वर्षी निर्यात करून या निर्यातीत अग्रेसर असलेली आणि ४२ देशांशी व्यापार करणारी सह्याद्री फार्म्स मराठी माणसासाठीच नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी अभिमानास्पद आहे. सह्याद्रीच्या सर्व शिलेदारांन, श्री. अझर तंबूवाला, श्री. मंगेश भास्कर, श्री. प्रशांत जयकृष्णा, श्री. शिवराम ढोकरे, श्री. मदन शिंदे आणि श्री. विलास शिंदे सरांना माझ्या मानाचा मुजरा...