image
  • 14
  • Oct
image

माझी आशु माझी चिऊ,
बाबाच्या बालपणात रमणारी...
 
"बाबा मी तुझी बहीण असते तर किती मजा आली असती ना! मी पण घाटल्यात वाढली असती. तू जी सगळी धम्माल सांगतोस ती मी पण केली असती. मला घाटला बघायचाय. मला तुझी शाळा बघायची आहे. तू ज्या गंमती मला सांगतोस ते सगळं मला बघायचं आहे..." चिऊने ही इच्छा खूप वेळा बोलून दाखवली होती. मला सुद्धा तिला हे सगळं दाखवायचं होतं पण योग येत नव्हता.
आज माझ्या शाळेत आयोजिय करण्यात आलेल्या माझ्या व्याख्यानामुळे हा योग आला. "चिऊ आपण आधी शाळेत जायचं. बाबा तुला संपूर्ण शाळा दाखवेल आणि त्याच्या आठवणीतल्या खूप साऱ्या गंमती तुला सांगेल. शाळेतला कार्यक्रम संपला की आपण चेंबूर फिरू, तिथून घाटल्यात जाऊ, घाटला फिरताना देखील तिथल्या आठवणी तुला सांगतो. आपली चाळ दाखवतो." 
चिऊच्या डोळ्यांत वेगळीच चमक आली होती. तिचं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार होतं. तसंही तिला माझ्यासोबत सेमीनार्सना यायला आवडतं. तिथे ती माझी ट्रेनिंग असिस्टंट असते. (आणि घरात मी तिचा लाईफटाईम असिस्टंट🤣). त्यात ती ट्रेनिंग बाबाच्या शाळेत होणार, त्यांनतर घाटला! 
'किती सांगू मी सांगू कुणाला?' अशी अवस्था चिऊच्या झाली होती. 
बाईक घेऊन जायचं ठरलं. म्हणजे मनसोक्त फिरता येईल. चिऊची कंपनी मला पहिल्यापासूनच आवडते. एक मूल म्हणून कधी कटकट नाही, फालतू हट्ट नाही. असतात त्या मस्त गप्पा. तिला काही न काही नवीन शिकायचं असतं. मी पण माझ्या किस्स्यांमधून तिच्यात अनेक शिकवणी पेरत असतो. तिला माझ्या व्याख्यानांमधले विषय आठवतात आणि त्यावर ती भरभरून बोलते, तिला काय कळलं ते सांगते. तिने काय चांगलं केलं, तिच्याकडून काय चुकलं, सगळं सगळं बाबाबरोबर शेअर करते...भन्नाट आहे माझी चिऊ!
शाळेत तिचा एकंदरीत वावर हा आत्मविश्वास दर्शवणारा होताच. त्याच बरोबर बाबाने सांगितल्या प्रमाणे शिक्षकांच्या पाया पडायचं हे देखील विसरली नाही. ती पाहिजे तितकी ऍक्टिव्ह असते. पुढे पुढे करत नाही. 
विनोदची मुलगी म्हणून नाही तर ती तिची स्वातंत्र्य छाप नेहमीच सोडते.  इथेही तसंच झालं. सर्व शिक्षकांकडून तिला कौतुक आणि प्रेम मिळालं. बाबाच्या हालचालींवर तिचं अतिशय बारीक लक्ष असतं. कुठे बाबाला मदतीची आवश्यकता असेल तिथे पुढे येऊन मदत करायला नेहमीच ती उत्साही असते. तिला काही काम सांगितलं तर 'येस सर!' असे उत्साहाने म्हणून करायला तयार असते. शाळेतील व्याख्यानाचे सगळे फोटो तिनेच काढले आहेत. फोटो पाहून मीच चकित झालो. 
आभार प्रदर्शनाच्या वेळी बाबाचं चाललेलं कौतुक ऐकून माझ्याकडे अभिमानाने ती एकेक कटाक्ष टाकायची आणि नजरेतून अभिमानाचा वर्षाव करायची. 
"बाबा मी पण असं काहीतरी करणार ज्याने तुला माझ्याबद्दल प्राउड फील होईल." ती निर्धाराने मला म्हणाली.
"मला माहित आहे चिऊ...मला तुझा अभिमान आजही आहे आणि उद्याही असेल." 
शाळेतून निघालो तिथून आंबेडकर उद्यान, सांडू गार्डन, डायमंड गार्डन असे दर्शन करत आणि किस्से सांगत डायमंड गार्डनच्या इथून घाटल्याचा रस्त्याला लागलो. घाटल्यात प्रवेश करताना पहिली म्युनिसिपल शाळा...तिथे आम्ही कसे खेळायचो. किटाळांवरून उड्या मारून शाळेच्या मैदानात कसे शिरायचो. किटाळांवरून धावत पकडापकडी कशी खेळायचो...सगळी धम्माल तिला अगदी रंगवून सांगितली. तिथून विजय दुर्गा मैदान...तिथले क्रिकेट खेळतानाचे किस्से, प्रत्येक गल्लीत दडलेला किस्सा मनाच्या कोपऱ्यातून बाहेर यायला लागला. 
शेवटी आमच्या चाळीत शिरलो. मिळतील त्यांना हाक मारत विजय दादाच्या घरी गेलो. तो नुकताच आजोबा झालाय आणि मी मामा...गुड्डीला मुलगा झाला आणि त्याला बघायला जायचंच होतं. त्याच्या घरी चाळीतल्या आठवणी बाहेर यायला सुरुवात झाली. त्याच्या बाजूचंच आमचं पहिलं घर जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो. चिऊला ते डिस्प्ररेटली बघायचं होतं. पण ते आता आमचं नव्हतं. आम्ही ते १२ वर्षांपूर्वी विकलं होतं. वहिनींना मी सांगितलं, "चिऊला आपलं घर बघण्याची खूप इच्छा आहे. आपल्याला बघायला मिळेल का?" 
वहिनी म्हणाली, "मिळेल ना! ते गावी गेलेत. चावी आपल्याकडेच आहे. दाखव तिला रूम." 
'अगर तुम किसी चीज को शिद्दतसे चाहो तो सारी कायनात उसे मिलाने की कोशीशमे जुड जाती है!' 
चिऊच्या बाबतीत आज तेच होत होतं. घराचं दार उघडलं आणि असंख्य आठवणी स्वागताला उभ्याच होत्या. 'चिऊ इथे बाहेर आपण सायकल उभी करायचो. ही बघ ही शिडी बाबांनी (माझ्या पप्पानी) ३० वर्षांपूर्वी बनवली आहे पण अजूनही ती शाबूत आहे. हे बघ इथे आपला फोन असायचा. इथे हंडे, मडकं. इथे एक कपाट होतं, इथे बसून आई चपत्या करायची, इथे आई-बाबा झोपायचे आम्ही वरच्या माळ्यावर, (वरच्या माळ्यावर) इथे देवरा होता, खाली कपाट होतं. ही आपली छोटी गॅलरी. या गॅलरीतून समोरच्या घराच्या गॅलरीत आम्ही उडया मारायचो. पतंगी शोधण्यासाठी घराच्या पत्र्यावर चढायचो. मी आणि आण्णा (प्रमोद) कसे आईचा मार खायचो. पप्पा (सुबु) कसा शांत होता....वगैरे वगैरे'
माझ्या सांगण्याचा आणि चिऊच्या ऐकण्याचा उत्साह मावळत नव्हता. सकाळी ८ वाजता आम्ही घर सोडलं होतं, दुपारचे चार वाजले होते. पण थकवा दोघांनाही नव्हता...
आज माझ्या बालपणात रमणाऱ्या चिऊमुळे मी स्वतः माझ्या बालपणात हरवून गेलो. शाळेतले आणि घाटल्यातले अविस्मरणीय क्षण डोळ्यासमोरून एखाद्या चलचित्राप्रमाणे धावत होते आणि  तोंडून कॉमेंट्री सारखे बाहेर येत होते. 
आजचा हा दिवस मला जगता आला तो केवळ माझ्या चिऊमुळे! थँक्यू व्हेरी मछ चिऊ...माझी बेस्टी... माझी बबडी! बाबा तुझं हे काँट्रिब्युशन नेहमीच लक्षात ठेवेल.