image
  • 07
  • Oct
image

आपण स्वतःशी आणि इतरांशी कसा संवाद साधतो त्याने आपले एकंदरीत व्यक्तिमत्त्व ठरत असते. आपले अंतर्गत आणि बाह्य व्यक्तिमत्त्व मोठ्या प्रमाणात आपल्या सांभाषणावर ठरत असतं . सांभाषणाच्या दृष्टीने लोकांना दोन प्रकरांमध्ये विभागता येवू शकते. 
१. पावर टॉकर्स आणि २. वीक टॉकर्स
या दोघांमधला फरक आपण समजून घेवू या. तुम्हीच ठरवा तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता आणि जर वीक टॉकर्स मध्ये येत असाल तर पावर टॉकर्स मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या सांभाषणाचा वापर करा. चल तर मग करुयात सुरुवात,
 
गुण क्रमांक १ - योग्य भाषेचा वापर करा .
 
भाषा पहिली) 
वीक टॉकर्स: "मला हे करावं लागेल." 
उदा. तुम्ही एखाद्या कस्टमर केअर ला काही तक्रार नोंदवण्यासाठी फोन केलात आणि जर समोरचा व्यक्ती वीक टॉकर असेल तर खालील प्रमाणे बोलेल,
“मला ग्राहक सेवेतील एखाद्याला विचारावे लागेल आणि त्यांना तपासणी करावी लागेल. त्यानंतर मला तुम्हाला परत कॉल करावा लागेल.”
 
पावर टॉकर्स: "मला हे करायला आवडेल."
तेच जर तो कस्टमर केअर कर्मचारी पावर टॉकर असेल तर खालील प्रमाणे बोलेल,
“मला आमच्या ग्राहक सेवा आणि उत्पादन तज्ञाशी आपल्या या समस्येविषयी चर्चा करायला आवडेल. उत्तम सोल्यूशनसह तुम्हाला परत कॉल करण्यास मला आनंद होईल.”
पावर टॉकर्स इतरांना मदत करणं हे त्रासदायक नाही तर आनंदायी वाटून घेतात. "मला हे करावं लागेल."  अशी भाषा न  वापरता "मला हे करायला आवडेल." अशी भाषा जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ती गोष्ट करण्याचा उत्साह तुमच्यात नक्कीच निर्माण होतो आणि समोरच्या व्यक्तींच्या मनात तुमच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण होते. 
 
भाषा दुसरी) 
वीक टॉकर्स: "मी प्रयत्न करेन." 
पावर टॉकर्स: "मी करेन/ करणार नाही."
प्रयत्न असं काही नसतं. एक तर तुम्ही करता किंवा नाही करत. त्यामुळे भाषा 'मी करेन' अशी ठेवा किंवा होणार नसेल तर समोरच्याला वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने 'जमणार नाही ' असे स्पष्ट सांगा. ही भाषा तुम्हाला वचनबद्ध व्हायला आणि एखादे कार्य पूर्ण करायला भाग पाडते.
 
भाषा तिसरी) 
वीक टॉकर्स: "मी करू शकत नाही."
पावर टॉकर्स: "मी अजून केलेलं नाही परंतु शिकून आणि सरावाने मला हे जमेल."
पावर टॉकर्स नेहमीच स्वतःच्या अमर्याद क्षमता ओळखतात. एखादी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती शिकून आणि सरावाने जमू शकते यावर त्यांचा विश्वास असतो. 
 
भाषा चौथी) 
वीक टॉकर्स: "माझी परिस्थिती निराशाजनक आहे." 
पावर टॉकर्स: "मी माझ्या आयुष्याचा दर्जा बदलू शकतो."
पावर टॉकर्सना विश्वास असतो की निराशाजनक परिस्थिति ही तात्पुरती आसते. ते स्वतःच्या भौतिक आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज असतात. तसे केले तर या परिस्थितीवर मात करून आपल्या आयुष्याचा दर्जा वाढू शकतो हे त्यांना माहीत असते. 
 
भाषा पाचवी) 
वीक टॉकर्स: "हि मोठी समस्या आहे."
पावर टॉकर्स: "हि आव्हानात्मक संधी आहे."
पावर टॉकर्सना प्रत्येक समस्येमध्ये संधी दिसते. त्यांना माहीत असतं की या समस्येवर तोडगा काढला तर ती भविष्यातली संधी बनू शकते. त्यामुळे ते समस्येवर रडत न बसता त्याचे  समाधान शोधण्यावर भर देतात.
लक्षात ठेवा. "आयुष्यातील समस्या एकतर आपल्याला संपवतात किंवा अधिक मजबूत बनवतात. आपण ठरवायचं, त्यांना बळी जायचं की त्यातून आरपार जायचं."
 
भाषा सहावी) 
वीक टॉकर्स: "तो/ ती वाईट आहे." 
पावर टॉकर्स: "त्याची/ तिची अमुक एक वागणूक वाईट आहे."
बऱ्याचदा आपण समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या वाईट गुणमुळे त्या व्यक्तीलाच वाईट घोषित करतो. जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या वाईट गुणाला या व्यक्तिपासून वेगळं करतो तेव्हाच तिच्यातील चांगल्या गोष्टी देखील आपल्या पाहता येतात. वरील भाषा वागणूक आणि व्यक्ती यांना वेगळं करण्यासाठी मदत करते. 
 
गुण क्रमांत २ - क्रेडीट देवून मोकळे व्हा.
 
वीक टॉकर्स: "मी नशीबवान होतो म्हणून मला ही गोष्ट मिळाली."
पावर टॉकर्स: "मी व्यवस्थित प्लान केला आणि मेहनत घेतली तसेच इतर अनेक लोकांची मला यात मदत झाली म्हणून मला ही गोष्ट मिळाली."
पावर टॉकर्स नम्रपणे आपल्या यशातील स्वतःच्या भूमिकेला रेक्ग्नाईज करतात. त्याच बरोबर या यशात ज्यांचा वाटा आहे त्यांना सुद्धा क्रेडिट देवून मोकळे होतात. 
 
वीक टॉकर्स: "मी तिचं/ त्याचं तोंडावर कौतुक केलं नाही. मला ते आवडत नाही. त्याने लोक डोक्यावर चढतात." 
याउलट पावर टॉकर्स जेव्हा लोक चांगलं करतात तेव्हा त्वरित तोंडावर त्याचं कौतुक करा. त्यासाठी ते ३ R's चा वापर करतात. 
 
कौतुकाचे 3R
Recognise: इतरांमधील एखाद्या चांगल्या गोष्टीचं निरीक्षण करा. 
Reward: तुम्ही निरीक्षण केलेली गोष्ट नेमकी काय आहे ते त्या व्यक्तीला सांगा आणि कौतुक करा. 
Report: ती चांगली गोष्ट इतरांशी शेअर करा. 
आमच्या इथे एक नवे इस्त्रीचे दुकान सुरू झाले होते. मी माझा ब्लेझर इस्त्री करण्यासाठी दिला होता. जेव्हा मी ब्लेझर घेण्यासाठी गेलो तेव्हा त्याने तो इस्त्री केलेला ब्लेझर सुंदर रित्या पेपरने गुंडाळून एका प्लॅस्टिक बॅग मध्ये पॅक केला होता. मला ती गोष्ट आवडली. मी लगेच Recognise केलं आणि म्हणलो, "मित्रा तू हा ब्लेझर ज्या पद्धतीने पॅक केला आहेस तसं मी याआधी कधीच पाहिलं नाही. यात तुझी तुझ्या कामा विषयीची निष्ठा दिसते. टू गुड यार! किप इट अप!" (Reward). तो इस्त्रीवाला अतिशय भावुक झाला. हे आजूबाजूला असलेल्या त्याच्या काही ग्राहकांसमोर मी बोलून दाखवलं (Report) आणि हे उदाहरण अनेकांशी शेअर केलं. जसं आता तुमच्याशी शेअर करतो आहे. 
 
गुण क्रमांक ३ - उत्साहाने मैदानात उतरा.
 
जर अपयश आलं तर....
वीक टॉकर्स: "मी अपयशी ठरलो. मी कामामध्ये, नात्यांमध्ये,व्यवहारामध्ये, संभाषणामध्ये, व्यवस्थापनामध्ये, .....चांगला नाही.”
पावर टॉकर्स: "मी शिकलो. आता पुढच्या वेळी अशा परिस्थितीला उत्तमरीत्या समोरं कसं जायचं हे मला कळलं.”
पावर टॉकर्स अपयशाला अंत मानत नाहीत. त्यांना विश्वास असतो की जोवर आपण मैदानात उभे आहोत, आपल्याला कुणी हरवू शकत नाही. जर अपयश आलंच तर त्याला अनुभव म्हणून स्वीकारतात आणि त्यावर उपाययोजना करून पुढच्या वेळी अधिक तयारीने सज्ज होतात. 
लक्षात ठेवा, "अपयश ही अधिक हुशारीने पुन्हा सुरूवात करण्याची नामी संधी आहे.”
 
वीक टॉकर्स: "मला नकारात्मक परिणाम दिसत आहेत."
पावर टॉकर्स: "मला सकारात्मक परिणाम दिसत आहेत."
आपण ज्यावर लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट मोठी होते. जर मैदानात उतरण्यापूर्वी आपले लक्ष नकारात्मक परिणामांवर असेल तर नकारात्मक गोष्टी मोठ्या होतील आणि तशाच परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल. त्याउलट जर सकारात्मक परिणामांवर लक्ष दिलं तर भन्नाट सकारात्मक परिणाम घडवून आणण्याची शक्यता जास्त असेल. त्यामुळे सकारात्मक परिणामांवर लक्ष द्या.
 
वीक टॉकर्स: "मी यात रुतत चाललो आहे."
पावर टॉकर्स: "मी नव्याने भरारी घेणार."
वाईट काळाबद्दल एक गोष्ट नक्की आहे.. की तो निघून जाईल. पावर टॉकर्स मानतात की वाईट काळ तात्पुरता आहे. हा कायमचा विध्वंस नव्हे. पहाटे पूर्वीचा एक तास अत्यंत गडध काळोखाचा असतो परंतु त्यानंतर उजाडणार याची खात्री असते. 
सुरेश भटांच्या कवितेचा चार ओळी या निमित्ताने आठवतात. 
विझलो आज जरी मी
हा माझा अंत नाही 
पेटेन उद्या नव्याने 
हे सामर्थ्य नाशवंत नाही.. 
 
पुढील भाग लवकरच..