image
  • 29
  • Jun
image

'जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीए'. आनंद चित्रपटातील हा डॉयलॉग तुम्हाला आठवतच असेल. पण प्रत्यक्ष आयुष्यात तसं जगणं फारच कमी जणांना जमतं. खरतर आयुष्य सोपं करण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाहीये. काही छोट्या गोष्टी करून आयुष्य सोपं, सहज आणि सुंदर करता येवू शकतं. त्यासाठी आयुष्य सोपं करणारे १४ मार्ग तुमच्यासाठी घेऊन आलोय. वाचा आणि अवलंबन करा. नक्कीच फायदा होईल. 
१. गर्दी कमी करा: 
घरात किंवा ऑफिसमध्ये नको असलेल्या गोष्टी काढून टाका. नको असलेले कपडे, रद्दी, भंगार, घरात किंवा ऑफिसमध्ये  उगाचच जागा व्यापणाऱ्या वस्तु, जास्त विचार न करता काढून टाका. घर किंवा ऑफिस जितकं मोकळं तितकी जास्त जागा होते आणि स्वच्छता राखणं सोपं जातं. तीच गोष्ट मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत करा. नको त्या फाईल्स, apps डिलिट करून टाका. आयुष्यातील नको ती माणसे काढून टाका. न्यूज चॅनेल बघण बंद करा. नकारात्मकता वाढवणाऱ्या गोष्टींची गर्दी आयुष्यातून कमी करा. 
२. नाही म्हणायला शिका: 
ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्यांना 'नाही' म्हणायला शिका. तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये कुणीतरी आणलेले कमी महत्त्वाचे काम, अचानक येणारा कॉल, मेसेज, नोटिफिकेशन्स, निव्वळ टाईमपास साठी बोलवणाऱ्या किंवा तिसऱ्या कुणातरी व्यक्तीवर नकारात्मक गप्पा मारायला आलेल्या व्यक्ती या सर्वाना नम्रपणे 'नाही' म्हणता आले पाहिजे. नाहीतर आपली कामे सोडून आपण दुसऱ्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांची कामे करतो किंवा त्यांच्या मनाप्रमाणे वागतो. नंतर आपली कामे नाही झाली म्हणून स्वतःला त्रास करून घेतो. म्हणूनच 'नाही' म्हणायला शिका. 
३. जागा फिक्स करा: 
घरात आणि ऑफिसमध्ये प्रत्येक गोष्टीची एक जागा असायला हवी आणि प्रत्येक गोष्ट ठरलेल्या जागी असायला हवी. त्यामुळे वस्तूंच्या जागा नक्की करा. प्रत्येक घेतलेली वस्तु त्याच जागी परत ठेवा. नाहीतर आपला अर्धा जन्म वस्तु मिळवण्यात जातो आणि अर्धा जन्म वस्तु शोधण्यात, नाही का!
४. कागदपत्रे: 
नको असलेली कागदपत्रे काढून टाका. महत्वाची कागदपत्रे व्यवस्थित फाईल करून किंवा फोल्डर मध्ये ठेवा. जेणेकरून ती हवी तेव्हा सहज सापडतील आणि गहाळ होण्याची शक्यता कमी होईल. 
५. वेळ: 
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त परिणाम कसे साधता येतील यावर काम करा. तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट आणखी कमी वेळात आणि कमी कष्टात कशी होईल त्याचे मार्ग शोधा. म्हणजे तुमच्याकडे वेळ मुबलक उपलब्ध होईल आणि तुम्ही तुमची स्वप्ने, आरोग्य, नाती, वैयक्तिक विकास इ. वर लक्ष केंद्रित करू शकाल. 
६. आर्थिक बाबी: 
महिन्याचं बजेट ठरवत जा. महिन्याला किती खर्च होणार? आणि त्यासाठी कुठून पैसे येणार? जास्त आले तर ते कुठे गुंतवायचे? आणि कमी पडले तर कुठून नियोजन करायचे? याचे बजेटिंग काढा. तसेच रोज किती पैसे आले? आणि किती खर्च झाले? याचा हिशोब ठेवा. त्यासाठी Money View (https://bit.ly/3AhEBer) किंवा Expense Manager (https://bit.ly/3yDq63D) सारख्या appsचा वापर करा. 
७. प्रत्येक रात्री: 
प्रत्येक रात्री येणाऱ्या दिवसाचे नियोजन करा आणि चांगल्या विचारांनी (चांगल्या गोष्टीचे वाचन करून, चांगला सकारात्मक व्हिडिओ पाहून इ.) दिवसाचा शेवट करा. 
८. 'वरी ब्रेक' शेड्यूल करा: 
दिवसभर येणाऱ्या चिंतानपासून मुक्त होणे गरजेचे असते. नाहीतर आपल्या दैनंदित कामात आपण आपले १००% देवू शकत नाही. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे 'वरी ब्रेक' शेड्यूल करणे. रोज झोपण्यापूर्वी ५ मिनिटे चिंता करण्यासाठी काढून ठेवायची. वेळ फिक्स करा.  म्हणजे दिवसभर कधी मनात चिंता आली तर मनाला सांगायचं, 'चिंता आता करायची नाहीये.  रात्री ११ वाजताचा वेळ त्यासाठी आहे.' करून तर  बघा! हळू हळू चिंता येणं बंद होईल. 
९. प्रत्येक सकाळी: 
कमीत कमी ४५ मिनिटे - चालणे, धावणे किंवा सायकलिंग, १० मिनिटे - मेडिटेशन आणि १५ मिनिटे - योग (श्वासाचे व्यायाम) करा. तंदुरुस्त रहा.   
१०. नातेसंबंध : 
जे लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, तुमची काळजी करतात, तुम्हाला चांगलं करण्यासाठी प्रेरित करतात, तुमच्या क्षमतांवर विश्वास बाळगतात आणि ज्यांच्या सोबत तुम्हाला राहायला आवडतं, अशा लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. किंबहुना अशीच माणसे आयुष्यात जोडत जा. 
११. स्वतःसाठी वेळ काढा: 
आठवड्यातून एकदा स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःचे लाड पुरवा. स्वतःला जे आवडतं ते करा. स्वतःसोबत वेळ घालवा. तुम्ही स्वतःला आवडलात तरच इतरांना आवडाल. तुम्हाला स्वतःची सोबत आवडली तरच इतरांना देखील तुमची सोबत आवडेल. 
१२. इतरांकडून अपेक्षा सोडा: 
इतरांकडून अपेक्षा करणं सोडा. अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे. इथे प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्यामुळे तो आपल्या प्रमाणे वागेल, बोलेल किंवा कृती करेल ही अपेक्षा सोडा. भरभरून अपेक्षा ठेवायची असेल तर स्वतःकडून ठेवा. पार पडलीत तर स्वतःला शाबासकी द्या. नाही झालं तर सुधारणा करा आणि पुढे व्हा. 
१३. माफी मागा आणि  माफ करा: 
ज्या लोकांनी तुमच्या बाबतीत वाईट केलंय किंवा तुमच्या बाबतीत चुकलेत, त्यांना माफ करा म्हणजे तिरस्कारच्या, बदल्याच्या भावनेतून मुक्त व्हाल. ज्यांच्या बाबतीत तुम्ही चुकला आहात त्यांची माफी मागा म्हणजे अपराधाच्या भावनेतून मुक्त व्हाल. या दोन गोष्टी तुम्हाला मोकळं करतील, स्वातंत्र्याची अनुभूती देतील. 'कुछ इस तरह से मैने अपने जिंदगी को आसान कर दिया. किसी से माफी मांग ली किसी को माफ कर दिया.' 
१४. फोकस: 
इतरांच्या आयुष्यावर फोकस करू नका. स्वतःची तुलना इतरांशी किंवा त्यांच्या आयुष्याशी करू नका. ते काय करतायत? यावर लक्ष केंद्रित करू नका. त्या ऐवजी स्वतः काय करू शकता? आपल्या आयुष्याचा दर्जा तुम्ही कसे वाढवू शकता? कोणती एक सुधारणा आपल्या आयुष्यात रोज करू शकता? यावर लक्ष करा आणि बघा तुमच्यासारखे फक्त तुम्ही असाल.